Pune : एक पूल अर्धवट; दुसऱ्याला बसला फटका

पुणे – सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जाण्यासाठी बांधलेल्या शिवा काशीद चौक ते हिंगणेदरम्यानच्या उड्डाण पुलाच्या अंतिम टप्प्यातील काम अद्याप अपूर्ण असल्याने १५ ऑगस्टला होणारे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. या विलंबाचा फटका विद्यापीठ चौकाजवळील राजभवन ते ई-स्क्वेअर उड्डाण पुलाच्या उद्घाटनालाही बसला आहे.
महापालिकेकडून एकाच दिवशी हे दोन्ही पूल सुरू करण्याचे नियोजन असल्याने सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाचे काम होईपर्यंत विद्यापीठ रस्त्यावरील पूलही सुरू होणार नाही. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून तीन उड्डाण पूल उभारण्याचे काम २०२२ मध्ये सुरू केले होते.
यापैकी दोन उड्डाण पूल पूर्ण होऊन सुरू झाले आहेत, तर तिसरा टप्पा माणिकबाग येथील काशीद चौक ते हिंगणे पेट्रोल पंपापर्यंत आहे. सुमारे ४० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या पुलाच्या माणिकबागेकडील रॅम्पचे काम आणि डांबरीकरण पूर्ण झाले आहे. हिंगणे बाजूच्या रॅम्पचे बहुतेक काम पूर्ण झाले असले, तरी कठडे, पथदिवे व रंगकाम शिल्लक आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपूर्वी हे काम पूर्ण होऊ शकणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेने ठेकेदाराला १५ ऑगस्टची अंतिम मुदत दिली होती. मात्र, काम वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांना अजून काही दिवस उद्घाटनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
काय म्हणते प्रशासन…
हिंगणे येथील रॅम्प पेट्रोल पंपाच्या दारासमोर उतरतो. त्यामुळे उड्डाण पुलावरून येणारी वाहने थेट डावीकडे वळून पंपावर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी व अपघात होऊ शकतात, असा अंदाज बांधून महापालिकेने रॅम्पच्या कठड्याची लांबी वाढवली आहे.
जेणेकरून वाहनांना थेट वळता येणार नाही. यासोबतच हिंगणे चौक ते पेट्रोल पंपदरम्यानचा रस्ता दुरुस्त करणे, अतिक्रमण हटवणे आणि बस थांब्याशेजारील अडथळे दूर करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाची मी पाहणी केली असून, काही काम शिल्लक आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला उद्घाटन शक्य नाही. सिंहगड रस्ता आणि विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल यांचे एकाच वेळी उद्घाटन केले जाईल.’- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.





