Pune: आता पोस्टमनही करणार सर्वेक्षणाचे काम; सुर्यघर योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी

पुणे : आता पर्यंत केवळ नागरिकांचे टपाल पोहचविण्याची जबाबदारी असलेले पोस्टमन लवकरच राज्यभरात सर्वेक्षणाचे काम करताना दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रधानमंंत्री सुर्यघर योजनेचे सर्वेक्षणाचे काम हे भारतीय डाक विभागातील सर्व पोस्टमन यांना देण्यात आले आहे.
हे सर्वेक्षण बुधवारपासून पोस्टमन घरोघरई जाऊन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या पोस्टमनला सहकार्य करावे असे आवाहन पुणे ग्रामिण डाकघर विभागाचे अधिक्षक पी. बी एरंडे यांनी केले आहे.
काय आहे सुर्यघर योजना ?
या योजनेद्वारे ०१ कोटी घरांना मोफत योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देऊन घरांना प्रकाश देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सौर पॅनलच्या किंमतीसाठी जनतेवर कोणताही बोजा संबधित नागरीकावर असणार नाही. यामध्ये लोकांना जास्तीत जास्त अनुदान दिले जाणार आहे.
शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात छतावरील सौर पॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळेल, वीज बिल कमी होईल आणि रोजगार निर्मिती होईल असा दावा करण्यात येत आहे.





