Pune : किरकी नव्हे, आता उल्लेख ‘खडकी’च

पुणे – ब्रिटिशांच्या राजवटीत खडकी नावाचा किरकी, असा करण्यात येत होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही संरक्षण मंत्रालयाच्या कागदोपत्रात किरकी असाच उल्लेख राहिला. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आलेल्या एका मराठी अधिकाऱ्याने याची दखल घेत खडकी, हे नाव वापरण्याबाबत संरक्षण मंत्रालयाकडे पत्रव्यवहार सुरू केला.
संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या पत्राची दखल सात ते आठ वर्षांनंतर घेतली. खडकी हेच नाव कागदोपत्री वापरण्याचा अध्यादेश आता काढण्यात आला आहे, त्यामुळे २०० वर्षांनंतर पुन्हा एकदा खडकीला तिची मूळ नाव खडकी मिळणार आहे.
मुळा नदीच्या काठावरील या गावाचा ब्रिटिशांकडून किरकी, असा उच्चार केला जात होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही केंद्र व राज्य शासनाच्या कामकाजामध्ये हेच नाव पुढे वापरले जात होते. रेल्वे, निवडणूक आयोग, टपाल खाते अशा वेगवेगळ्या विभागात किरकी ऐवजी खडकी नावाचा वापर केला जाऊ लागला. परंतु, संरक्षण विभागाकडी कागदपत्रांत मात्र किरकी असा उल्लेख कायम होता. तो आता काढण्यात येणार आहे.





