Pune : दिवसभर टप्प्याटप्प्याने पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत

पुणे – शहरात दिवसभर टप्प्याटप्प्याने पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालेच, याशिवाय शहरात जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. रात्रीपासूनच संततधार पाऊस पडत होता. पहाटे पाच वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
सोमवारपासून बहुतांश शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचीही पावसामुळे तारांबळ उडाली. तर ज्या रस्त्यांवर शाळा आहेत तेथे वाहतूक कोंडी झाल्याने शाळांच्या व्हॅन त्यात अडकल्या. शास्त्री रस्त्यावर या वाहतूक कोंडीतून ॲम्बुलन्स काढणे कठीण गेले.
जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, फर्गसन रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, शास्त्री रस्ता या मोठ्या आणि प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने आणि त्यात सिग्नल बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. दिवसभर शहरात जवळपास असेच चित्र होते.
दरम्यान, नैऋत्य मौसमी पावसाने विदर्भ, मध्यमहाराष्ट्राचा भाग मोठ्या प्रमाणात व्यापण्याला सुरुवात झाली आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, पुणे घाट परिसर या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून, धरणक्षेत्रातही पावसाने जोर धरला आहे. राज्यातील काही भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर पुणे परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
शहर आणि परिसरात सर्वाधिक पाऊस कुरवंडे गावात झाला असून, तो ४६.५ मिमी नोंदवला गेला आहे. याशिवाय लवासा (३४.५मिमी), माळीण (२६.० मिमी), भोर (२४.० मिमी), निमगिरी (२२.० मिमी) या भागातही २० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.





