PUNE: रस्ता नाही… आता पाणीही मिळेना; कात्रज- कोंढवा रस्ता रूंदीकरणाचा अडथळा

पुणे – कात्रज- कोंढवा रस्ता गेल्या पाच वर्षांंपासून रूंदीकरणाच्या कचाट्यात अडकल्याने कोंढवा बुद्रुक, उंड्री, महंमदवाडी, कात्रज भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या अर्धवट रूंदीकरणामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असताना आता या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी दिले जाणार असले तरी हे पाणी घेऊन जाणार्या जलवाहिनीचे काम रूंदीकरणामुळे रखडल्याने नागरिकांना टॅंकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहे.
महापालिकेकडून या भागातील सुमारे साडेतीन ते चार लाख नागरिकांना समान पाणी योजने अंतर्गत स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाणार आहे. सध्या, काही भागात तळजाई तसेच लष्कर जलकेंद्रातून पाणी दिले जाते. यासाठी राजस सोसायटीपासून पुढे एक हजार मिमी व्यासाची जलवाहीनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला तेव्हा हा रस्ता ८४ मीटर रूंद गृहीत धरून ज्या भागात जागा ताब्यात आली त्यानुसार, पाणी पुरवठा विभागाने जलवाहीनी टाकली.
मात्र, मागील वर्षी ८४ मीटरचे भूसंपादन शक्य नसल्याने पालिकेने हा रस्ता ५० मीटर रूंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समान पाणी योजनेच्या जलवाहीनीचे नियोजन फसले ती वेडीवाकडी होत आहे. त्यामुळे रस्त्याचे नियोजन पूर्ण होई पर्यंत जलवाहीनी न टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून समान पाणी योजनेचे काम ठप्प झाले आहे. त्याचा फटका मात्र या भागातील नागरिकांंना बसत आहे.





