पुणे : केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरविला. त्याचा काहीसा राजकीय लाभ त्यांना मिळाला आहे; परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत. देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही. त्यामध्ये केवळ दुरुस्ती करता येते. अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे, असे मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उद्घाटन नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या ‘उडान’ या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार अरविंद सावंत यांना आदर्श खासदार, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार, विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच, ॲड. मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. राजकारणासंदर्भात तरुण सुशिक्षित व्हावा. त्यांच्यामध्ये राजकारणाविषयी जागृती निर्माण व्हावी, हा युवा संसद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे. तो निश्चितच सफल होत आहे. यातून प्रेरणा घेऊन उद्याचे चांगले नेतृत्व निर्माण झाले, तर सशक्त भारत निर्माण होणार आहे, असे ॲड. शार्दुल जाधवर यांनी स्पष्ट केले.