Pune : नवी पालिका नाही; गावांना हवा तेवढा निधी; आमदार योगेश टिळेकर यांची माहिती

हडपसर – महापालिकेत समाविष्ट गावांना सुविधा पुरवण्यात महापालिकेची कसरत होत आहे. वाढीव मिळकतराचा मुद्दा, शासनाकडे विशेष निधीची मागणी, धरणांतून वाढीव पाणीसाठा आदी बाबींचा विचार करता शहराच्या पूर्व भागातील हडपसर-मांजरी-वाघोली आणि त्या लगतच्या गावांची एकत्रितपणे स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी आमदार टिळेकर यांनी केली आहे.
यापार्श्वभूमीवर नव्या महापालिकेचा कोणताही प्रस्तावित निर्णय सध्या तरी नसल्याने नव्याने समाविष्ट ३४ गावांना हवा तेवढा निधी देऊ, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले असल्याचे आमदार टिळेकर यांनी सांगितले.
आमदार टिळेकर म्हणाले की. पुणे शहराच्या हद्दीलगत असलेल्या ३२ गावांचा महापालिकेत समावेश झाल्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. यातून समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरविणेही महापालिकेला शक्य होत नाही. यातून नागरीकांत नाराजीचे वातावरण आहे.
शहराच्या पूर्व भागांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे विभाजन करून नवीन महापालिका केल्यास अनेक समस्या मार्गी लागतील. नियोजनबद्ध विकासासाठी पूर्व पुण्यासाठी नव्या महापालिकेची गरज असल्याने यावर तत्काळ निर्णय घेणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे टिळेकर यांनी सांगितले.
“महापालिका प्रशासनावरील वाढता ताण लक्षात घेऊन पूर्व पुण्यासाठी नव्या महापालिकेची मागणी केली होती, सध्या तरी असा विचार नसला तरी भविष्यात हा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू राहणार आहे. सध्या समाविष्ट गावांकरीता अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न असेल.”- योगेश टिळेकर, आमदार, विधान परिषद.





