Pune : रात्रीच्या शहर स्वच्छतेला अखेर सुरुवात

पुणे – शहरातील रस्ते सकाळीपर्यंत स्वच्छ दिसावेत, यासाठी पुणे महापालिकेने अखेर रात्रीतून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. ८) रात्रीपासून या मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १३६ टन कचरा उचलण्यात आला. या कामासाठी एकूण १४७२ कर्मचारी आणि २१३ वाहनांचा वापर करण्यात येत आहे.
शहरातील मंडई, तुळशीबाग, टिंबर मार्केटसारख्या बाजारपेठांमध्ये दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचतो. याशिवाय अनेक नागरिक रात्री उघड्यावर कचरा टाकत असल्याने रस्त्याकडेला उकिरड्यांचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त नागरिक आणि सकाळी उशिरा होणारे कचरा संकलन यामुळे शहरात घाण दिसते. त्यामुळे महापालिकेने रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कचरा संकलन व झाडणकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील चित्र बदलले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाने या योजनेचे नियोजन गेल्या वर्षभरापासून सुरू केले होते. मात्र, आयुक्तांकडून मंजुरी मिळत नसल्याने मोहिमेची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. नुकतेच नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी यांनी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी रात्रीतूनच कचरा संकलन करण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यामुळे या उपक्रमाला गती मिळाली आहे.
आयुक्तांच्या निर्देशानंतर उपायुक्त संदीप कदम यांनी तातडीने परिमंडळ एक ते पाचच्या उपायुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षकांची बैठक घेऊन या मोहिमेचे सविस्तर नियोजन केले. रात्री स्वच्छता करणाऱ्या या मोहिमेत क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी व निरीक्षकांना त्यांच्या भागातील स्वच्छतेवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शहराच्या प्रमुख रस्त्यांसह गर्दीच्या भागांमध्ये ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी स्पष्ट केले. याशिवाय शहराच्या ज्या भागात रात्रीच्या वेळी कचरा साचतो ,असा भाग निश्चित करून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्रपणे कर्मचारी नियुक्त केल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.





