Pune News : घरात घुसून तरुणाचा गळा चिरुन खून; पर्वती दर्शन येथील घटना

पुणे : पर्वती दर्शन येथे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एका तरुणाचा घरात घुसून चाकूने गळा कापून खून करण्यात आला. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी तासाभरातच आरोपीला सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळून ताब्यात घेतले आहे. दानिश सिद्दीकी( २५, रा.पर्वती दर्शन) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश प्रभाकर क्षिरसागर(३५, रा.यवतमाळ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दानिश हा सहा महिण्यापुर्वीच भावाकडे रहायला आला होता. तो दररोज स्वारगेट परिसरात कच्छी दाबेलीची गाडी लावत होता. तर आरोपी दिनेश हा मुळचा यवतमाळचा असून तो फिरस्ता आहे. स्वारगेट परिसरात तो पदपथावर रहातो. तो आज(सोमवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास दानिश याच्या घरी आला. तेव्हा दानिश आवरा आवरी करत होता.
अचानक घरात घुसून त्याने चाकूने दानिशच्या गळा आणि पाठिवर सपासप वार केले. दानिशच्या आवाजाने त्याच्या खोलीच्या वर रहाणारा त्याचा भाउ , वहिणी आणि रहिवाशी धावत आले. तोवर दिनेशने चाकूसह पळ काढला होता. नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो हाती लागला नाही. दरम्यान दानिशला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी दिनेशचा माग काढला असता, तो सातारा रस्त्यावरील पुमा शोरुमच्या मागे लपून बसला होता. पोलीस त्याला पकडायला जात असताना त्याने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.
त्याला ताब्यात घेतल्यावर, त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने कोणतेही कारण सांगितले नाही. तसेच दागिनच्या घरच्यांनाही या दोघांमध्ये वाद कोणत्या कारणाने झाला हे माहित नाही. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.




