Pune : पुणे बाजार समिती : सभापतिपदी प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी १६ मार्च २००१ ते १० फेब्रुवारी २००३ मध्ये त्यांनी सभापतिपद भूषविले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
सभापती दिलीप काळभोर यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक झाली. शुक्रवारी (दि. १८) झालेल्या निवडणुकीत १८ संचालकांकडून सभापतिपदासाठी प्रकाश जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. निवड झाल्यानंतर बाजार समिती परिसरात जगताप यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत व फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
प्रकाश जगताप म्हणाले, माझ्या मागील कार्यकाळात समितीचे ८ कोटी उत्पन्न होते. त्यानंतर ४० वस्तूंचे नियमन केले. त्यामुळे उत्पन्न ३५ कोटींवर पोहोचले. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीचे उत्पन्न ८० कोटी रुपये होते. ते सध्या १०६ कोटींवर गेले आहे. येत्या काळात शेतकरी व व्यापाऱ्यांत समन्वय ठेवून सेस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. ५ ते १० टक्के उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवून काम केले जाणार आहे.
चौकशी चुकीची वाटते
आम्ही निवडणुकीच्या धामधुमीत होतो. त्यामुळे बाजार समितीतील गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत कल्पना नाही. त्यानुषंगाने आम्ही सर्व एकत्रित येऊन उत्तर देऊ. पणन संचालकांनी ५१ मुद्द्यांवर लावलेली चौकशी चुकीची असल्याचा आमचा दावा आहे. झालेले सर्व आरोप हे राजकीय प्रेरणेतून झालेले आहेत.
व्यक्ती दोन, नाव एकच!
बाजार समितीच्या सभापतिपदी प्रकाश जगताप यांची निवड झाली असून, निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप होते. त्यामुळे जगतापांनीच प्रकाश जगतापांची निवड केल्याची गमतीदार चर्चा सुरू होती.





