Pune News | बेवारस अस्थींचे पूजन आणि विसर्जन ; राष्ट्रीय कला अकादमीचा अनोखा उपक्रम

प्रभात वृत्तसेवा
पुणे – हिंदू परंपरेनुसार मृत्यूनंतर अस्थी विसर्जन ही आत्म्याच्या शांतीची शेवटची पायरी मानली जाते. अपघात अथवा इतर कारणांनी रस्त्यावर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या देहाची ओळख पटत नाही. अशा मृतदेहांना वारस नसल्याने त्यांचे जीवन बेवारस अवस्थेत संपते. अशा बेवारस आत्म्यांना सन्मानाने निरोप मिळावा, या हेतूने राष्ट्रीय कला अकादमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वपित्री अमावास्येनिमित्त बेवारस अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण, मंत्रोच्चारात अस्थी विसर्जन विधी पार पडला.
आरटीओजवळील होळकर संगम घाटावरील उपक्रमासाठी पालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पराग ठाकूर, डॉ. मिलिंद भोई, विनायक घाटे, राजेंद्र बलकवडे, शिरीष मोहिते, नितीन पंडित, पियुष शहा, आशिष जराड, राजाभाऊ कदम, दिलीप काळोखे, लता राजगुरू, पालिका उपायुक्त माधव जगताप, सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक, आरोग्य निरीक्षक विक्रम सरवदे, मुकादम नागेश बाराथे, नागेश लांडगे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन अकादमीचे मंदार रांजेकर, रोमा लांडे, अमर लांडे, सदाशिव कुंदेन, अतुल सोनवणे, सुनील सोनटक्के, सचिन देसाई, बाला शुक्ला, किरण फाळके, राजेश निकम, सुप्रिया दळवी, प्रिया भोंडवे, मनोज गवळी यांनी केले.सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांचे आपण स्मरण करतो. बेवारस आत्म्यांनाही शांती लाभावी ही भावना मनात ठेवून राबवलेला हा उपक्रम म्हणजे खरी माणुसकी आहे.
धर्म-जात न पाहता अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करणे यातून एकतेचा संदेश राष्ट्रीय कला अकादमीच्या उपक्रमातून समाजात जातो, असे मिसाळ म्हणाल्या.बेवारस मृतांना कोणी नसते, त्यामुळे त्यांचे शेवटचे संस्कार होणे कठीण होते. गेली १५ वर्षे आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत. कोणताही धार्मिक अडसर न ठेवता केवळ माणुसकीच्या भावनेतून हा उपक्रम केला जातो, असे रांजेकर म्हणाले.




