पुणे – मतदार राजाने कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मतदानाचा हक्क बजावत कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज पार पडला. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात डाॅ. निलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर येथील बूथ क्र. १९२ वर मतदानाचा हक्क बजावला. आपल्या शहराच्या समस्या सोडविण्यासाठी आणि बलशाली भारत बनविण्यासाठी शंभर टक्के मतदान लोकसभा आणि विधानसभेला होणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच मतदानाला जाताना कोणीही मनात भिती न बाळगता, जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दरम्यान, मतदानाचा हक्क बाजावल्यानंतर सर्वसामान्य नागरिक स्वतःचे छायाचित्र घेण्याची इच्छा असते. मात्र मतदानाच्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रावर त्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, नेत्यांचे काही नागरिकांचे मतदान करतानाचे व्हिडीओ आणि छायाचित्र दिसतात. त्यामुळे मतदान केंद्रावर नागरिकांनी छायाचित्र घ्यावीत का न घ्यावीत याबाबत निवडणूक आयोगाने सर्वांनाच समान नियम ठेवावा, अशी अपेक्षाही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.