Pune News : भोर तालुक्यातील कचरे वस्तीवर रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल; ज्येष्ठ नागरिकाला झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ

भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुंबळे गावातील वाघमाची वाडी येथील कचरे वस्तीवर पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी (दि. १७) घडलेल्या घटनेने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रकाश पडला आहे.
वस्तीतील ज्येष्ठ नागरिक रामभाऊ कचरे (वय ७०) गुरे चारण्यासाठी गेले असताना निसरड्या डोंगरात घसरून त्यांचा पाय मोडला. मात्र, वस्तीपर्यंत जाणारा कच्चा रस्ता पावसाळ्यात चिखलमय होत असल्याने कोणतेही वाहन तिथे पोहोचू शकत नाही. परिणामी, ग्रामस्थांना रामभाऊ यांना झोळीत टाकून तीन किलोमीटर निसरडी आणि धोकादायक वाट तुडवत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. पावसात पाऊण तास हा कठीण प्रवास केल्यानंतर खाजगी वाहनाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्याअभावी उपचाराला उशीर झाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली.
ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, “पावसाळ्यात कचरे वस्ती पूर्णपणे दळणवळणापासून तुटते. आजारी, वृद्ध आणि लहान मुलांना झोळीत टाकून चिखलातून रुग्णालयापर्यंत न्यावे लागते. प्रशासनाला याची जाणीव असूनही पक्का रस्ता बांधला जात नाही. किती काळ अशी परिस्थिती सहन करायची?” पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था गंभीर बनते, ज्यामुळे जीवितहानीचा धोका वाढतो. ग्रामस्थांनी पक्का रस्ता बांधण्याची तातडीची मागणी केली आहे.





