प्रभात वृत्तसेवा पुणे – व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी यांनी व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला. जग्गी हे भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत आणि एक जानेवारी १९९३ रोजी भारतीय नौदलात त्यांची नियुक्ती करण्यात आली.ते ध्वज अधिकारी नेव्हिगेशन आणि डायरेक्शन तज्ज्ञ आहेत आणि तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी विविध ऑपरेशनल, स्टाफ, डिप्लोमॅटिक आणि इंस्ट्रक्शनल जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी क्षेपणास्त्र जहाज आयएनएस वीर आणि स्वदेशी शिवालिक श्रेणीतील स्टेल्थ गाईडेड मिसाइल फ्रिगेट आयएनएस सह्याद्रीचे नेतृत्व केले आहे.वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि गोव्यातील प्रतिष्ठित नेव्हल वॉर कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या शैक्षणिक नियुक्त्यांमध्ये, इंडियन नेव्हल अकादमी येथील विभागीय अधिकारी आणि वेलिंग्टन येथील डीएसएससी येथील प्रशिक्षक या कामांचा समावेश आहे. त्यांनी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयात नौदल सल्लागार आणि नवी दिल्ली येथील एनएचक्यू येथे कमोडोर (परदेशी सहकार्य) म्हणून काम करताना परराष्ट्र सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबाबती समृद्ध आणि मौलिक अनुभव प्राप्त केला.एनडीएच्या कमांडंट पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी, ते महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग होते. तिथे त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या तटवर्ती भागाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळली आणि पश्चिम नौदल कमांडच्या अखत्यारीत प्रशासन, पायाभूत सुविधा प्रकल्प, नौदल समुदायाचे कल्याण यासंबंधी विविध उपक्रम राबवले.