Pune News : सायकलींच्या मदतीने सिंहगडच्या आदिवासी, गरजु विद्यार्थ्यांनी केली ज्ञानाची दिवाळी साजरी

पुणे : सिंहगड परिसरातील आदिवासी, दलित आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 5 ते 10 किलोमीटरची पायपीट करावी लागते. अशा विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने मावळा जवान संघटना आणि निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने रविवारी (19 ऑक्टोबर 2025) 25 सायकली मोफत वाटप करण्यात आल्या. या अनोख्या भेटीमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खऱ्या अर्थाने ज्ञानाची दिवाळी साजरी केली.
ऐतिहासिक दिवाळी आनंदसोहळा
सिंहगडच्या पायथ्याशी निगडे मोसे येथील शिवशंभू शिल्प सृष्टीत आयोजित ऐतिहासिक दिवाळी आनंदसोहळ्यात हा सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सिंहगड-पानशेत परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शिक्षणासाठी खडतर संघर्ष करणाऱ्या आदिवासी, कातकरी आणि दलित समाजातील विद्यार्थ्यांना या उपक्रमातून सायकली देण्यात आल्या. सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे 12 वे वंशज बाळासाहेब पासलकर यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही आनंदोत्सव साजरा केला.
जयघोषात आनंदसोहळ्याला प्रारंभ
‘हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय वीर बाजी पासलकर’ या जयघोषात आणि हलगी-तुरारीच्या निनादात कार्यक्रमाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती वीर बाजी पासलकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे तसेच राजदंड आणि ऐतिहासिक दिव्यांचे पूजन बाळासाहेब पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला आदिवासी कातकरी समाजातील महिला, युवक आणि अठरा पगड जातींचे सुमारे 500 हून अधिक वारसदार आणि महिला उपस्थित होत्या.
पालकांचा आनंद
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ होणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. ओसाडे येथील पालक राजेंद्र विठ्ठल लोहकरे म्हणाले, “गोडधोड पदार्थ खाऊन क्षणिक आनंद मिळतो, पण आमच्या मुलांना शिक्षणासाठी सायकल मिळाल्याने आमच्या घरी खऱ्या अर्थाने ज्ञानाची दिवाळी साजरी झाली आहे.”
सामाजिक बांधिलकीचा उपक्रम
मावळा जवान संघटना आणि निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या उपक्रमाने गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. सायकलींच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार असून, त्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी होण्यास मदत होईल. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारा ठरला असून, यामुळे सिंहगड परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे.





