Pune News : कोर्ट केस सुरू असताना ३६ कोटींचा व्यवहार ; पुणे बाजार समितीच्या मनमानीमुळे आश्चर्य

प्रभात वृत्तसेवा
पुणे – न्यायालयात याचिका दाखल असताना आणि खरेदीखतापूर्वी पुणे बाजार समितीने गुरुवारी (दि. २५) पुन्हा यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर ३६ कोटी रुपये वर्ग केले. मनमानी पद्धतीने पैसे वळवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून, याप्रकरणी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, सचिव आणि संबंधित कर्मचारी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.यशंवत सहकारी साखर कारखान्याची जमीन २९९ कोटी रुपयांना पुणे बाजार समितीच्या उपबाजारासाठी खरेदी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली.
मात्र, उच्च न्यायालयातील दाखल असलेल्या रिट याचिकेतील निर्णयाच्या आधीन हा व्यवहार करण्याची अट घालून याबाबत शासन निर्णय काढला आहे. नियमानुसार आणि कायदेशीर बाबींनुसार व्यवहार करण्याचे काही संचालकांनी बजावले होते, तरीही बाजार समितीने नियम न पाळता ३६ कोटी रुपये कारखान्याच्या खात्यावर वर्ग केले. याचा परिणाम काय होणार, हे येत्या काळात कळेल.
बैठकीतील संचालकांवर जबाबदारी..
मंगळवारच्या बैठकीत एका संचालकांने माझ्या जबाबदारीवर व्यवहार करू, असे सांगत काही संचालकांचा होकार मिळवला. मात्र, भविष्यात चौकशी लागल्यानंतर नियमानुसार संबंधित सर्व संचालकांवर जबाबदारी निश्चित होणार असल्याने भविष्यात काही संचालकांच्या सातबार्यावर बोजे चढण्याची शक्यता आहे.
“राज्य शासनाने कारखाना जमीन व्यवहार करण्यास बारा एकनुसार परवानगी दिली आहे. त्यानुसार पैसे वर्ग केले असून, करारानुसार टप्प्याटप्प्याने निधी देणार आहोत. सर्व प्रक्रियेअंती खरेदी खत होईल.”
– प्रकाश जगताप, सभापती, बाजार समिती, पुणे.





