Pune News : व्यावसायिकाला धमकावून चोरट्यांनी ४० लाख रुपये नेले लुटून, तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : व्यावसायाच्या कारणासाठी पुण्यात आलेल्या व्यावसायिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील ४० लाख रुपयांची बॅग तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अभिजित विष्णु पवार (वय ३२, रा. रामलिंगनगर, येडशी, ता जि. धाराशिव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आंबेगाव येथील बाबजी पेट्रोलपंपासमोर मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित पवार हे व्यावसायिक आहेत. ते एका कामासाठी ४० लाख रुपये घेऊन आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र मंगेश ढोणे हाही होता. बाबजी पेट्रोलपंपासमोरील इमारतीमध्ये त्यांचे व्यावसायिक कामासाठी आले होते. त्यांनी त्यांची गाडी बाजूला लावली.
गाडीतून पैशांची बॅग घेऊन ते खाली उतरले व इमारतीकडे जाऊ लागले. त्याचवेळी एका कारमधून तिघे जण आले. त्यांनी मंगेश ढोणे याच्या खांद्यावरील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांना अभिजित पवार यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना हाताने मारहाण करुन ते तिघे चोरटे पळून गेले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने व इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करुन चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास करीत आहेत.





