Pune News : मास्क घालून आले, बंदूक दाखवली आणि सोनं घेऊन पसार; पुण्यातील धक्कादायक प्रकार !

पुणे – भरदिवसा बंदुकीच्या धाकाने वडगाव बुद्रुक येथील सराफी पेढी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दुचाकीवर तोंडाला मास्क लावून आलेल्या तिघांनी येथील गजानन ज्वेलर्समध्ये घुसून महिलेला मारहाण करत शस्त्राच्या धाकाने पाच सोनसाखळी आणि एक नेकलेस असा पाच तोळे सोन्याचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
दरम्यान, घटनेनंतर पसार झालेले तिघे आरोपी एका चारचाकी गाडीच्या डॅश कॅमेर्यात कैद झाले असून, सिंहगड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके त्यांच्या मागावर आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात जबरी चोरी, आर्म ऍक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगल घाडगे (55, रा. सदाशिव दांगट नगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास वडगाव, रेणुका नगरी परिसरात असलेल्या गजानन ज्वेलर्स येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती शंकर यांनी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. काही वेळानंतर फिर्यादीचे पती एका अंगठीची डिलेव्हरी ग्राहकाला देण्यासाठी दुकानाबाहेर पडले. त्यावेळी फिर्यादी या एकट्याच दुकानात होत्या.
दरम्यान दीडच्या सुमारास दुचाकीवरून आलेले तिघेजण थेट दुकानात शिरले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. तर त्यांच्याकडे पिस्तूल होते. त्यांनी काउंटरवर बसलेल्या फिर्यादी यांना मारहाण करीत धमकावले.
पिस्तुलाचा धाक दाखवून महिला बसलेल्या काउंटर पाठीमागील शोकेसमधून हाताला येईल तेवढे सोने घेऊन आरोपी पसार झाले. आरोपींनी महिलेला मारहाण केली असून, त्यांच्या डोक्यात दुखापत झाली आहे. महिलेने आरडाओरड करताच नागरिकांनी दुकानाच्या आवारात गर्दी केली.
तोपर्यंत आरोपींनी तेथून पळ काढला होता. नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तिघे पळू जाताना दिसून येते आहेत. हा प्रकार एका चारचाकी गाडीच्या डॅश कॅमेर्यात कैद झाल आहे. तिघांनी आपले चेहरे झाकले असून, पाठीमागे बसलेल्या एक व्यक्ती पिस्तूल दाखवत दहशत निर्माण करत असल्याचे दिसून येते आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.





