Pune News : निघोजे येथील जि.प. शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत

चिंबळी : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून, पालकांनी आपली मुले या शाळांमध्ये दाखल करावीत, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. निघोजे (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पगुच्छ, शालेय साहित्य, गणवेश आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. डॉ. पुलकुंडवार यांनी मुलांना बोट धरून शाळेत नेल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हा प्रवेश सोहळा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. यावेळी नववी आणि दहावीच्या वर्गांचे उद्घाटन तसेच सीआर फंडातून बांधलेल्या किचनशेडचे लोकार्पणही करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शाळा, ग्रामस्थ आणि पालक यांची एकत्रित भूमिका शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे,” असे मत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.





