Pune news : ‘पुणे बार असोसिएशन’ निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट; अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत, ‘या’ दिवशी होणार मतदान

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. यंदा अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. गीतांजली बालवडकर, काळुराम भुजबळ आणि विशाल शिवले यांच्यात ही निवडणूक होणार आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
उपाध्यक्ष पदाच्या ३ जागांसाठी तब्बल आठ जण नशिब अजमावत आहेत. यामध्ये, सर्वसाधारण प्रवर्गातील दोन जागांसाठी समीर बेलदरे, प्रविण देशमुख, श्रीकांत काळभोर, प्रतापराव मोरे आणि कांताराम नप्ते हे रिंगणात आहे. तर, महिला राखीव प्रवर्गात निता भवर, प्रितीसिंह परदेशी, पुनम साळुंखे यांच्यामध्ये लढत होणार आहे. सचिव पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील दोन जागांसाठी श्रीकांत बनसोडे, सम्राट जांभुळकर, विजय लेंगरे, अभिजित पोळ, गणेश थरकुडे हे रिंगणात आहे.
तर, महिला राखीव प्रवर्गातून एका जागेसाठी नेहा जांभळे आणि वृषाली सुर्यवंशी यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. खजिनदार पदासाठी अंजली बांदल आणि अतुल हरपळे यांच्यामध्ये लढत होणार आहे. हिशोब तपासणीच्या एका जागेसाठी सर्वासाधारण प्रवर्गातून शिवराज निंबाळकर आणि हर्षवर्धन राऊपाटील तर महिला राखीव प्रवर्गातून तेजवंती कपले आणि पुजा पवार हे निवडणूक रिंगणात आहेत.
कार्यकारिणीसाठी पंधरा सदस्यांची सर्वानुमते निवड
पुणे बार असोसिएशनच्या पंधरा कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महिलांसाठी तीस टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर पुर्वीची दहा सदस्यांची कमिटी आता पंधरा झाली आहे. त्यांपैकी दहा जागांवर पुरूष तर उर्वरित पाच जागांवर महिला उमेद्वार निवडून आल्या आहेत.
सर्वसाधारण गटातून मयुर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रितेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार, प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे यांची निवड झाली आहे. तर, महिला राखीव गटातून संध्या रायबोले, शितल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियंका घाडगे यांची निवड झाली आहे.





