Pune News | वर्षानुवर्षे साचलेलं भंगार अखेर हटणार! ; महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतेचा नवा अध्याय

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिकेच्या शाळांमध्ये वर्षानुवर्षे पडून राहिलेले भंगार अखेर उचलले जाणार आहे. या भंगारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. तसेच तेथे नियमित स्वच्छता होत नसल्याने शाळांचा परिसर अस्वच्छ होऊन जागाही अडून पडली. त्यामुळे हे भंगार साहित्य तातडीने हटविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. पी. जे. चंद्रन यांनी दिली.शहरात पालिकेच्या मालकीच्या २०९ इमारतींमध्ये शाळा भरतात.
या इमारतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भंगाराचे ढीग साचले आहेत. आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांसाठी पालिका २०९ इमारतींमध्ये जवळपास अडीचशे शाळा चालवते. शाळांची दरवर्षी पालिका देखभाल व दुरुस्ती करते. याशिवाय, शाळांसाठी नवीन बाके, फळे, प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य तसेच दैनंदिन वापराचे इतर साहित्यही खरेदी केले जाते.नवीन साहित्य आल्यानंतर जुने साहित्य वर्गाच्या खोल्यांमध्येच ठेवले जाते. अनेक शाळांमध्ये तीन ते चार वर्ग भरून हे साहित्य पडून आहे.
दुसरीकडे, याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचे कोणतेही धोरण नाही. तसेच शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापकांना त्याचे अधिकार नसल्यामुळे साहित्य तसचे राहते.ही बाब लक्षात आल्यानंतर आता पालिकेने हे साहित्य शाळांमधून तातडीने हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने हे साहित्य शहरातील सात ते आठ ठिकाणी संकलित करून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या साहित्याची भंगारात विक्री करण्याची जबाबदारी पालिकेच्या वाहन विभागाकडे असेल असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.





