Pune News : ‘टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर’ची मोबाईल ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन सज्ज; ग्रामीण भागातील महिलांची करणार मोफत तपासणी

पुणे – तळेगांव येथील टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरने मोबाईल ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन सुरू केली आहे. या स्क्रिनिंग व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व तालुक्यात जावून स्तनाच्या कर्करोगाची मोफत तपासणी केली जाणार आहे. या व्हॅनचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ११) पार पडला.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक सुंग वूक चोई, संचालक युनचियोल ली, अध्यक्ष पबित्रा स्वेन, नेहा वाघचौरे, सेवानिवृत्त कमलेश कार्ले, वैद्यकीय संचालक डॉ. नेहा कुलकर्णी, सचिव प्रमोद दाभाडे, उपाध्यक्ष श्रीशैल मेंथे आणि ऑन्को लाईफ हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांचे स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच लवकर निदान व्हावे, त्याबाबत पुरेशी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव यांच्या सहकार्य आणि पॉस्को इंडियाच्या आर्थिक मदतीमधून स्क्रिनिंग मोबाईल व्हॅन सुरू करण्यात आली. ही व्हॅन पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुणे शहर, पुरंदर, शिरूर, वेल्हे या गावांमध्ये उपलब्ध राहिल.
त्यामध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी थर्मल स्क्रीनिंग, गर्भाशयाच्या कर्करोगासाठी पॅप स्मीअर/व्हीआयए, विविध कर्करोगांसाठी रक्त चाचण्या आणि मौखिक तपासणीसह मोफत कर्करोग तपासणी करणार आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे जर काही असामान्यता आढळली तर रुग्णांना रुग्णालयात मॅमोग्राम किंवा सोनोग्रामचा सल्ला दिला जाईल. कमलेश कार्ले म्हणाले, हे मोबाईल युनिट पुणे जिल्ह्यातील वंचित आणि गरजू व्यक्तींना सेवा देण्यासाठी कार्यरत राहिल.
अवघ्या दोन मिनिटात होणार चाचणी…
स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरत आहे. नव्याने सुरु केलेल्या या व्हॅनमध्ये प्रगत एआय-तंत्रज्ञानावर आधारित, रेडिएशन-मुक्त स्तन तपासणी केली जात असून ते वेदनारहित आणि गोपनीयतेसाठी अनुकूल आहे. चाचणीचा निकाल फक्त दोन मिनिटांत तयार होतो.
महिलांना रुग्णालयात न जाता पूर्णपणे सुरक्षित, खाजगी आणि अचूक तपासणी करण्यासाठी या मोबाईल व्हॅनचा नक्कीच फायदा होईल. याठिकाणी शासकीय योजनाअंतर्गत लाभ देणे हा मुख्य उद्देश आहे. गरजूंना सवलतीच्या दरात उपचारही पुरवत आहे.
– सचिन देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, ऑन्को लाईफ हॉस्पिटल.





