Pune News | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश ; विद्यापीठाने वसतिगृहाची सोय वाढवली

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने वसतिगृह क्रमांक १० मधील तीन मजले विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ३२० अतिरिक्त विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल. यामुळे वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जागा मिळू शकतील.
विविध विद्यार्थी संघटनांनी प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृह मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीसमोर आंदोलनही केले होते. पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात देश-विदेशातून विद्यार्थी येतात, मात्र सर्वांनाच वसतिगृहात प्रवेश मिळतोच असे नाही.
आतापर्यंत विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक १ ते ९ मध्ये ५७० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. तरीही ३४६ विद्यार्थी प्रतीक्षेत होते. आता वसतिगृह क्रमांक १० मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने ही प्रतीक्षा संपणार आहे.





