Pune News: कोथरूडमध्ये राज्यातील पहिले ‘मॉडेल’ मुद्रांक व नोंदणी कार्यालय; पाहा काय आहेत खास सुविधा
Pune News: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन; महापौर मंजुषा नागपुरे आणि नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांची उपस्थिती.

Pune News – नागरिकांना मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, आधुनिक आणि दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिले मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालय कोथरुड येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, नोंदणी महानिरिक्षक रविंद बिनवडे उपस्थित होते.
कोथरूड येथील रिव्होलेशन मॉलमध्ये हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यावेळी महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, मुद्रांक व नोंदणी विभागाकडे येणारा प्रत्येक नागरिक हा आमचा ग्राहक आहे. दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना उत्कृष्ट सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी मुद्रांक व नोंदणी कार्यालये चांगली, सुसज्ज आणि दर्जेदार असावीत, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे.
त्यानुसार राज्यातील पहिले मॉडेल कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आले आहे. नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात चांगले वातावरण, व्यवस्थित प्रतीक्षा व्यवस्था आणि आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना सन्मानपूर्वक सेवा मिळावी, यासाठी या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे.
मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. नागरिकांना कार्यालयात वारंवार येण्याची गरज पडू नये, अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध व्हाव्यात आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी विभागाचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.





