One Year Master Degree: यूजीसीचा मोठा निर्णय! आता दूरस्थ अन् ऑनलाइन माध्यमातून एका वर्षात मिळवा ‘मास्टर डिग्री’
One Year Master Degree: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचे नियम ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणालाही लागू.

One Year Master Degree – विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत चार वर्षांचा ऑनर्स पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मुक्त, दूरस्थ किंवा ऑनलाइन माध्यमातून एका वर्षात पदव्युत्तर पदवी (मास्टर) पूर्ण करता येणार आहे. यूजीसीने घेतलेल्या या निर्णयामुळे नोकरदार, गृहिणी, कौटुंबिक किंवा भौगोलिक कारणांमुळे नियमित महाविद्यालयात जाऊ न शकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यूजीसीच्या सचिव प्रा. श्यामा रथ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या नव्या नियमावर शिक्कामोर्तब केले आहे. नव्या शैक्षणिक धोरणामधील मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमात बदल घडवून आणले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांचे ऑनर्स शिक्षण पूर्ण केले आहे, त्यांच्यासाठी पदव्युत्तर शिक्षण दोन वर्षांऐवजी एका वर्षाचे असणार आहे. आता याच धोरणाची व्याप्ती वाढवून दूरस्थ व ऑनलाइन शिक्षणालाही यामध्ये समाविष्ट केले आहे.
परिणामी, पदवीनंतर परदेशात किंवा इतर शहरांत नोकरी करणाऱ्या तरुणांना नोकरी सांभाळून स्वतःचे उच्च शिक्षण अवघ्या वर्षात पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा अभ्यासक्रम राबवण्यासाठी यूजीसीने काही स्पष्ट निकष आखून दिले आहेत. ही सुविधा सर्वांनाच थेट उपलब्ध होणार नसून, ज्या उच्च शिक्षण संस्थांकडे आधीपासूनच संबंधित विषयात दोन वर्षांचा दूरस्थ किंवा ऑनलाइन पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्याची पूर्वमान्यता आहे, त्यांनाच हा एका वर्षाचा पर्याय उपलब्ध करून देता येईल.
याशिवाय एमबीए, एमसीए आणि पीजीडीएम यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश पात्रता ही संबंधित नियामक संस्थांच्या नियमांनुसारच राहील. तसेच या अभ्यासक्रमांची रचना, क्रेडिट फ्रेमवर्क आणि मूल्यमापन पद्धत यूजीसीच्या नियमांनुसार असणे आणि संस्थेच्या विद्या परिषद, अभ्यासमंडळाची मंजुरी घेणे अनिवार्य केले आहे.





