Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा ‘स्मार्ट’ कायापालट; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमांची खैरात!
खासगी आंतरराष्ट्रीय शाळांशी स्पर्धा करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धिक पाया भक्कम करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.

Pune News : खासगी आंतरराष्ट्रीय शाळांशी स्पर्धा करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि बौद्धिक पाया भक्कम करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. इंग्रजी लॅब, परदेशी भाषांचे धडे, सीमावर्ती राज्यांच्या शैक्षणिक भेटी (ज्ञानसेतु) आणि अगदी सुरक्षेसाठी शालेय बस सेवेपासून ते थेट ‘नासा/इस्रो’ अभ्यासभेटीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ‘प्रज्ञा विकास’ कार्यक्रमापर्यंत… अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची घोषणा जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सन २०२६-२७ च्या पुरवणी अंदाजपत्रकात या विविध गुणवत्ता विकास योजनांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती विवेक वळसे पाटील यांनी या निर्णयांची माहिती दिली.
या योजनेअंतर्गत निवडक २५० गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘प्रज्ञा विकास कार्यक्रम’ राबवला जाणार आहे. यात इयत्ता ७ वी व ८ वीतील प्रज्ञावान विद्यार्थी, इस्रो-नासा अभ्यासभेटीच्या मुलाखतीस पात्र ठरलेले आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संवादकौशल्य वाढवण्यासाठी निवासी शिबिरे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन पुरवले जाईल.
तसेच, विद्यार्थ्यांचे लेखन अधिक सुबक आणि स्पष्ट व्हावे याकरिता ‘हस्ताक्षर सुधार कार्यक्रम’ चालवला जाणार आहे. किशोरवयीन मुलींच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड वितरणसाठी , तर इयत्ता ४ थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पूर्वसराव व्हावा म्हणून शिष्यवृत्ती सराव परीक्षा कार्यक्रमासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि इंग्रजी लॅब तसेच संगणक सुविधा उभारण्यासाठी शिक्षक सक्षमीकरणाकरिता, जागतिक स्तरावरील भाषा कौशल्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत २५० शिक्षकांना परकीय भाषेचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या उपक्रमांची आर्थिक तरतूद
१. शालेय बस सेवा: १ कोटी २० लाख (सुरक्षित वाहतुकीसाठी ३ शाळांमधील ५ बसचे संचालन)
२. ‘ज्ञानसेतु’ उपक्रम : ६० लाख (सीमावर्ती राज्यांना शैक्षणिक भेटी व सांस्कृतिक देवाणघेवाण)
३. परकीय भाषा शिक्षण: ५० लाख (शिक्षकांना विशेष भाषा प्रशिक्षण)
४. शिष्यवृत्ती सराव परीक्षा (इ. ४ थी व ७ वी): ४४ लाख
५. शिक्षक सक्षमीकरण व इंग्रजी लॅब: ४० लाख
६. मुलींसाठी सॅनिटरी पॅड वितरण: ३९ लाख
७. प्रज्ञा विकास कार्यक्रम: १५ लाख (२५० गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण)
८. हस्ताक्षर सुधार कार्यक्रम: १५ लाख





