Pune News : सीताफळांचा हंगाम सुरू; मार्केटयार्डात पहिली आवक

पुणे – गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. बुधवारी (दि. १२) मार्केटयार्डातील फळ विभागात २० किलो आवक झाली. घाऊक बाजारात लिलावात किलोस ३०१ रुपये भाव मिळाला.
सातारा जिल्ह्यातील कनेर येथील शेतकरी सुनील धर्माजी डोळस यांच्या शेतातून सीताफळांचे व्यापारी युवराज काची यांच्या मे. तुळजाराम पंथाराम बनवारी या फर्मवर ही आवक झाली.
हा माल बिबवेवाडी येथील व्यापारी सुरज नानस्कर यांनी खरेदी केला. जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. सीताफळाचे तीन बार असतात. त्यापैकी पहिल्या बारची ही आवक आहे.
हळूहळू आवक वाढणार आहे. आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर नागरिक आवर्जून सीताफळांची वाट पाहत असतात. वडकी, पुरंदर तालुका, यवत, उरळी कांचन, राजगुरूनगर, खेड भागासह पुणे जिल्ह्यातून आणि सातारा जिल्ह्यातून आवक होत असते.
सीताफळाला घरगुती ग्राहकांकडून मागणी असते. मात्र, त्याचबरोबरच अलीकडच्या काळात पल्पसह विविध प्रक्रीया उद्योगांकडून मागणी वाढली आहे.
सीताफळाचा हंगाम वेळेवर सुरू झाला आहे. चांगल्या प्रतीच्या सीताफळाची बाजारात आवक झाली. लिलावात मागील वर्षीपेक्षा किलोल ५० रुपये जास्त भाव मिळाला.
– युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड.




