Daler Mehndi : अखेर ‘त्या’ वादावर दलेर मेहंदी यांनी मौन सोडले; दिवाळी निमित्त शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाले…..
हा संपूर्ण वाद १८ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील टिहरी येथे झालेल्या 'सिद्धपीठ माँ कुंजापुरी पर्यटन एवं विकास मेळ्या'दरम्यान सुरू झाला.

Daler Mehndi : मंचावर हजारोंच्या गर्दीसमोर झालेला अपमान, नशेत असल्याचा गंभीर आरोप आणि त्यानंतर सोशल मीडियावर उसळलेला संताप… या सगळ्या वादावर अखेर लोकप्रिय गायक दलेर मेहंदी यांनी मौन सोडलं आहे. मात्र, त्यांनी उत्तराखंडच्या मंत्र्यांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर देण्याऐवजी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या कुटुंबीयांचे, भाऊ मिका सिंह यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या एका भावनिक पोस्टमधून त्यांनी अलीकडच्या कठीण काळातील भावना व्यक्त केल्या. ‘माझ्या भावाने मिका याने माझ्यासाठी खंबीरपणे आवाज उठवला’, अशा शब्दांत त्यांनी भावाचे कौतुक केले. विशेष म्हणजे, कलाकाराच्या आयुष्यात तो नसताना त्याच्या कामाचं कौतुक केलं जातं; मात्र मला माझ्या हयातीतच एवढं प्रेम अनुभवायला मिळालं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दिवाळीच्या पोस्टमधून दलेर मेहंदी काय म्हणाले?
वादानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त होताना दलेर मेहंदी यांनी आपल्या चाहत्यांसाठी भावनिक संदेश लिहिला. गेल्या अनेक वर्षांपासून गाण्यांमधून आणि प्रत्येक मंचावर चाहत्यांचे प्रेम मिळत आले आहे. मात्र अलीकडे अनुभवलेल्या प्रसंगानंतर लोकांनी ज्या पद्धतीने आपली साथ दिली, विश्वास दाखवला आणि समर्थनार्थ आवाज उठवला, त्याने आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.
या पोस्टमध्ये दलेर मेहंदी यांनी कुटुंबीयांचा विशेष उल्लेख केला. भाऊ मिका सिंह याने कठीण काळात खंबीरपणे साथ दिली. पत्नी तरन हिने धैर्य आणि अढळ विश्वासाने आपल्याला हिंमत दिली. मुलगा गुरदीप याने शांतपणे परिस्थितीचा सामना केला, तर मुली रबाब, अजीत आणि प्रभजोत यांनी बिनशर्त प्रेम दिले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दलेर मेहंदी यांनी आपल्या पोस्टमध्ये कलाकारांच्या आयुष्याविषयी एक भावनिक विचारही मांडला. अनेकदा कलाकार या जगात नसताना त्यांच्या प्रवासाचे आणि योगदानाचे कौतुक केले जाते. मात्र आपल्याला स्वतःच्या आयुष्यातच एवढे प्रेम अनुभवण्याची संधी मिळाली, यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजतो, असे त्यांनी म्हटले.
कुटुंब म्हणजे केवळ जन्माने जोडलेली माणसे नव्हेत, तर कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभे राहणारे लोकही आपले कुटुंबच असतात, याची जाणीव या काळात अधिक खोलवर झाल्याचे त्यांनी नमूद केले. दिवाळीच्या शुभेच्छा देताना चाहत्यांच्या प्रेमाने आपल्या मनात निर्माण केलेला प्रकाश हा घराघरांत उजळणाऱ्या दिव्यांपेक्षाही खास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नेमकं प्रकरण काय?
हा संपूर्ण वाद १८ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील टिहरी येथे झालेल्या ‘सिद्धपीठ माँ कुंजापुरी पर्यटन एवं विकास मेळ्या’दरम्यान सुरू झाला. या कार्यक्रमात दलेर मेहंदी यांचे सादरीकरण सुरू असताना उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल थेट मंचावर आले. दलेर मेहंदी यांच्या गाण्याच्या सादरीकरणावर आक्षेप घेत त्यांनी त्यांच्यावर दारूच्या नशेत गाणे गात असल्याचा आरोप केला.
‘तुम्ही दारू पिऊन लोकांना मूर्ख बनवत आहात. तुम्हाला बोलताही येत नाही, मग गाणार कसे?’ अशा शब्दांत मंत्र्यांनी त्यांना सुनावले. एवढेच नव्हे, तर यापूर्वी उत्तराखंडमध्ये एका गायकाला मारहाण झाल्याचा उल्लेख करत त्यांनी वादग्रस्त वक्तव्यही केले. या संपूर्ण प्रकारामुळे मंचावरील वातावरण तणावपूर्ण झाले. दलेर मेहंदी यांनी संयम राखत मंत्र्यांना मंचावरून जाण्याची विनंती केली आणि काही वेळानंतर पुन्हा गाणे सुरू केले.






