Pune News : कुरुळी येथे तुकाराम महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे उत्साहात प्रस्थान

चिंबळी : आषाढी वारीनिमित्त कुरुळी (ता. खेड) येथील विठ्ठल रुक्मिणी सांप्रदायिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित तुकाराम महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान बुधवारी (दि. १७) दुपारी १२ वाजता झाले. गेल्या सतरा वर्षांची परंपरा जपत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष गुलाब सोनवणे, सरपंच, उपसरपंच आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी मंदिरात आरती आणि विणा पूजन करण्यात आले. टाळ-मृदंगांच्या गजरात महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि खांद्यावर झेंडा घेऊन गावातून दिंडी मिरवणूक काढली.
स्वर्गीय सुलोचना सोनवणे यांच्या स्मरणार्थ ह.भ.प. सत्यवान सोनवणे यांच्या वतीने सर्व वारकरी आणि भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पावसाळी वातावरण लक्षात घेता, माजी उपसरपंच व माजी चेअरमन आशिष मुंढे यांनी सर्व भाविकांना रेनकोट वाटप केले. उपस्थित मान्यवरांनी सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले.





