Pune News : हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अनागोंदीविरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन

हडपसर : आज हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील बेजबाबदार, अकार्यक्षम आणि बेशिस्त प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला.याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शेकडो संतप्त नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.
शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले यांच्यासह अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. पिण्याच्या पाण्यात दूषितपणा, रस्त्यांवरील बेकायदा अतिक्रमणे, बायोमेट्रिक यंत्रणेची बंद अवस्था, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि नागरी समस्यांकडे दुर्लक्ष यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटनांनी एकत्र येत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ठोस पावले उचलली. आंदोलनादरम्यान नागरिकांनी आपले त्रासदायक अनुभव माध्यमांसमोर मांडत प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला.
विशेष म्हणजे, आंदोलकांनी क्षेत्रीय कार्यालयातच भाजीपाला आणि फळांचे स्टॉल थाटून ठिय्या मांडला, ज्यामुळे कार्यालय परिसर काही काळ अतिक्रमित बाजारपेठेसारखा दिसू लागला.
नागरिकांचा त्रास थांबवण्यासाठी ठोस कार्यवाही आवश्यक
“हडपसर-मुंढव्यातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे त्रस्त आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. दूषित पाणी, अतिक्रमणे आणि अधिकाऱ्यांची बेजबाबदारी यामुळे यंत्रणा कोलमडली आहे. येत्या आठ दिवसांत प्रशासनाने सुधारणा न केल्यास शिवसेना अधिक तीव्र आंदोलन करेल आणि प्रशासनाला वठणीवर आणेल,” असे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी ठणकावून सांगितले.





