Pune news : बी. जे. मेडिकलमध्ये रॅगिंगचा गंभीर आरोप; एमबीबीएस विद्यार्थी १४ दिवसांपासून बेपत्ता
तन्मय १८ जुलै रोजी नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून वसतिगृहातून बाहेर पडला. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसताना दिसून आला.

Pune news : शहरातील प्रतिष्ठित बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा गंभीर आरोप समोर आला आहे. एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे याला काही विद्यार्थ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्याचे वडील अजयकुमार वंगे यांनी केला आहे.
या त्रासाला कंटाळून तन्मयने वसतिगृह सोडल्याचा दावा करण्यात आला असून, तो गेल्या १४ दिवसांपासून कुटुंबीयांच्या संपर्काबाहेर आहे. याप्रकरणी वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
तन्मय १८ जुलै रोजी नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून वसतिगृहातून बाहेर पडला. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत बसताना दिसून आला.
लोणीकंद रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून, धक्क्यामुळे त्याच्या आईला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचेही सांगण्यात आले.
सुट्टीत घरी आल्यानंतर तन्मयने महाविद्यालयातील काही स्थानिक विद्यार्थी त्रास देत असल्याची माहिती आई-वडिलांना दिली होती. मात्र, पुढील चार वर्षे याच महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे असल्याने तक्रार केल्यास आणखी त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली होती, असे वडील अजयकुमार वंगे यांनी सांगितले.
तन्मयने शालेय जीवनातील मित्र हर्षवर्धन चव्हाण याच्याकडेही रॅगिंगमुळे होत असलेल्या त्रासाबाबत मन मोकळे केले होते, असा दावा वडिलांनी केला आहे. उत्कर्ष सिंग, श्रेया यादव आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून तन्मयला त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रकरणाची गंभीर दखल घेत बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. मात्र, समितीच्या चौकशीची प्रगती किंवा आतापर्यंत झालेल्या कारवाईबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये यापूर्वीही रॅगिंगची घटना समोर आली होती. एका निवासी डॉक्टरच्या रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.





