Pune News – सरकारी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभाग नवनवीन योजना राबवते. मात्र, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात शाळेच्या अधिकृत वेळेत हजेरी दाखवून विद्यार्थी चक्क खासगी शिकवणीला (ट्यूशन) जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी आता संपूर्ण जिल्ह्यातील शाळांच्या तपासणीचे आदेश दिले असून, या प्रकाराला थेट मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले. शाळेत हजेरी लावून प्रत्यक्षात मात्र खासगी क्लास गाठायचा, असा हा अजब आणि नियमबाह्य कारभार बारामतीत एका सतर्क नागरिकाच्या तक्रारीमुळे उघड झाला. प्राथमिक चौकशीत केवळ बारामतीच नव्हे, तर इंदापूर आणि शिक्रापूर परिसरातही असेच प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, की शाळेच्या वेळेत विद्यार्थी खासगी शिकवणीला जात असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामध्ये केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही, तर त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. शाळेत उपस्थिती नोंदवल्यानंतर विद्यार्थ्यासोबत बाहेर काही दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आपापल्या तालुक्यातील शाळांची तातडीने तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या गैरप्रकारासाठी आता केवळ संबंधित शिक्षकांवर कारवाई होईलच. याशिवाय त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवरही कडक कारवाई करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे. लेखी खुलासा मागवा जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मूकसंमतीनेच असा प्रकार होत असल्याचे चित्र आहे. शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांचे बाह्य वास्तव्य खपवून घेतले जाणार नाही. शाळेत उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांना खासगी वर्गास पाठवणाऱ्या मुख्याध्यापकांकडून तत्काळ लेखी खुलासा मागवावा, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.