Pune News: रस्ते मोकळे केले अन् पदपथ अडविले! गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर कोंडी
Pune News: विसर्जन मिरवणुकीचे मोठे गाडे रस्त्यांच्या कडेला उभे ठेवल्याने मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी; तातडीने साहित्य व गाडे हटवण्याची पुणेकरांची मागणी.

Pune News- गणेशोत्सव संपल्यानंतर बहुतांश गणेश मंडळांनी महापालिकेच्या नियमावलीनुसार ४८ तासांच्या आत रस्त्यावरील मांडव तसेच देखावे काढून घेतले आहेत. मात्र, त्यासाठी वापरलेले साहित्य अद्याप पदपथावर टाकले आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्ते मोकळे झाले असले तरी पदपथ मात्र साहित्याने व्यापलेले आहेत. यामुळे नागरिकांना पदपथावरून चालता येत नसल्याने मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
अनेक ठिकाणी मंडळांनी उभारलेले रनिंग मांडव तसेच देखाव्यांसाठी पदपथही फोडले असून, त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील वैभवशाली गणेशोत्सव नुकताच पार पडला. पालिकेने २०२१ मध्ये दिलेल्या परवानगीनुसारच यंदाही गणेश मंडळांना परवानगी दिली होती. त्यानुसार, मंडपासाठी रस्त्याचा एक चतुर्थांश भागापेक्षा अधिक जागा व्यापता येणार नाही, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे बंधनकारक होते.
उत्सव संपल्यानंतर ४८ तासांत मंडप काढून घेणेही बंधनकारक आहे. त्यानुसार, अनेक मंडळांनी मांडव तसेच देखावे काढून घेतले आहेत. मात्र, वापरलेले साहित्य हलविण्याऐवजी ते लगतच्या पदपथावरच अस्ताव्यस्तपणे टाकले आहे. यामुळे पदपथ अडविले गेल्याने नागरिकांची मोठी अडचण होत आहे. अनेक ठिकाणी हे साहित्य धोकादायक पद्धतीने ठेवले असून, पादचाऱ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडळांनी तातडीने पदपथ रिकामे करावेत, अशी मागणी होत आहे.
पदपथही फोडले
अनेक भागांत गणेशोत्सवात जाहिरातींसाठी मंडळांनी रनिंग मांडव उभारले होते. तसेच महापालिका, पोलिसांसह विविध संस्थांकडून मदत कक्ष, नियंत्रण कक्ष आणि वॉच टॉवर उभारले होते. यासाठी अनेक ठिकाणी थेट पदपथ खोदण्यात आले असून, काही भागांत रस्त्यावरही खड्डे घेतले आहेत.
प्रत्यक्षात रस्त्यावर अथवा पदपथावर खड्डे घेतल्यास ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित मंडळाची असते. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी अनेक ठिकाणी पदपथ नव्याने केलेले होते. तेच फोडण्यात आले आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल निर्माण होत आहे.
मिरवणुकीचे गाडेही तसेच…
अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी वापरलेले गाडे अद्यापही रस्त्यांच्या कडेला धोकादायक पद्धतीने ठेवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी हे मिरवणुकीचे गाडे रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने उभे केल्याने प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हे गाडेही तातडीने हटवावेत, अशी मागणी होत आहे.






