Pune News : भोर तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 7 जुलै रोजी

भोर : पुणे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी २०२५ ते २०३० या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत ७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता भोर येथील अभिजीत मंगल कार्यालय, महाड रोड येथे होणार आहे.
तहसिलदार कार्यालय, भोर यांनी जिल्हाधिकारी (ग्रामपंचायत शाखा), पुणे यांच्या २५ जून २०२५ रोजीच्या पत्र क्रमांक पसप-३/कावि/७१८/२०२५ नुसार ही कार्यवाही हाती घेतली आहे. तहसिलदार राजेंद्र नजन यांनी सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवकांना सूचना दिल्या असून, या सोडतीची नोटीस ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर आणि चावडीवर लावण्याचे तसेच दवंडी देऊन प्रसार करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भातील प्रसिद्धी अहवाल ३ जुलै २०२५ पर्यंत तहसिल कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामाजिक न्याय आणि समता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे.





