Pune news : प्रभाग रचनेवर ‘राशप’ ठेवणार लक्ष; महापालिका निवडणूकीसाठी पक्षांकडून तयारी सुरू

पुणे : महापालिका निवडणूकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काॅग्रेस शहदचंद्र पवार पक्षाकडून भाजपला घेरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पक्षाकडून सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध विकास न करता शहरात केलेल्या चुकीच्या कामामुळे शहरात निर्माण झालेल्या समस्या तसेच पर्यावरणाच्या नुकसान झाले असल्याने, सध्या असलेल्या कामांची पोलखोल केली जाणार आहे.
त्यासाठी पक्षाकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटी बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
ज्येष्ठ नेत्या माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, आमदार बापूसाहेब पठारे, कमलनानी ढोले पाटील, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, विशाल तांबे ,अश्विनी कदम, श्रीकांत पाटील ,सचिन दोडके, भगवानराव साळुंखे ,डॉ.सुनील जगताप, पंडित कांबळे ,प्रकाश म्हस्के या बैठकीस उपस्थित होते.
प्रभाग रचनेवर ठेवणार लक्ष :
निवडणूकीसाठी केल्या जाणाऱ्या प्रभाग रचनेसंदर्भात निर्माण होणाऱ्या संभाव्य तक्रारींबाबत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिका निवडणूकीसाठी २०२२ मध्ये करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादी काॅग्रेसकडून मोठया प्रमाणात आक्षेप घेण्यात आले होते. तसेच, त्याबाबतही तक्रारी करण्यात आल्या होत्या.या निवडणूकीतही असे प्रकार घडण्याची शक्यता असल्याचे सांगत तांबे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.





