Pune News : दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड; मध्यवर्ती भागात वाहतुकीचा खोळंबा, बाजारपेठा हाऊसफुल्ल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – येत्या शुक्रवारपासून सर्वांत मोठा असलेला दिवाळी सण सुरू होत आहे. त्यापूर्वीचा एकच सुटीचा रविवार खरेदीसाठी मिळाल्याने बाजारपेठेत ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली होती.येत्या शुक्रवारी वसुबारस आहे. या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. हा सर्वांत मोठा सण असल्याने नव्या कपड्यांपासून ते अनेक वस्तूंची खरेदी या दिवसांत केली जाते. विक्रेत्यांकडेही या कालावधीत नवीन, ट्रेंडी वस्तू, कपडे विक्रीसाठी असतात, त्यामुळे या काळात लग्नाचा बस्ताही बांधला जातो.
केवळ कपडेच नव्हे, तर आकाशकंदील, रांगोळ्या, चित्रे, तोरणे, पणत्या, आदी अनेक गोष्टींच्या विक्रींसाठी पथारी व्यावसायिकांनीही रस्त्यांवर आपली दुकाने थाटली आहेत. त्याच्या खरेदीसाठीही ग्राहक रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे.याशिवाय तुळशीबाग हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे घेतलेल्या नव्या कपड्यांवर, साड्यांवर मॅचिंग दागिने आणि अन्य शृंगाराच्या गोष्टीही घेण्यासाठी महिलावर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.
त्यामुळे लक्ष्मी रस्त्यासह तुळशीबाग परिसरातही नागरिकांनी गर्दी केली होती.फराळ हा दिवाळी सणाचा आत्माच असतो. घरगुती फराळ विक्री करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्याशिवाय अनेक मिठाई विक्रेत्यांकडेही दिवाळीच्या काळात फराळविक्री सुरू असल्याने खरेदीसाठी गर्दी झाली. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडे फराळ पाठवण्याची लगबग आधीच सुरू असते. त्यामुळे त्या खरेदीसाठीही नागरिकांची बाजारपेठेत झुंबड उडाली आहे.





