Pune News | पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस दोन दिवस रद्द

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पुण्यावरून धावणारी पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस सलग दोन दिवस रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून, गाडी रद्द झाल्यामुळे काहींना प्रवास रद्द करावा लागला. या ट्रेनने महाराष्ट्रासह अन्य ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना खासगी बस, एसटीने प्रवास करावा लागला.
पुणे-जम्मू तावी झेलम ही पुणे विभागातील महत्त्वाची रेल्वे गाडी आहे. पुण्यातून थेट जम्मूमध्ये जाण्याची सोय असल्याने या गाडीला बारा महिने गर्दी असते. शिवाय उत्तर प्रदेश, दिल्ली या शहरांना ही रेल्वे थेट जोडत असल्याने पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. परंतु, गेले दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे.
यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही गाडी रद्द झाल्यामुळे आपल्या गावी परतणाऱ्या उत्तरेतील प्रवाश्यांची कोंडी झाली आहे. अनेकांना प्रवास रद्द करावा लागला. तसेच मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पावसामुळे काही रेल्वे गाड्यांना फटका बसला आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.





