Pune News | महापालिका रणसंग्रामाची तयारी; राज ठाकरे करणार पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष एकमेकांना टाळी देत एकत्र आल्यानंतर पुण्यात पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होणार असल्याने मनसे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांना काय काममंत्र देणार याकडे लक्ष लागले आहे.
उद्या (शनिवारी) भवानीपेठ येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या सभागृहात हा मेळावा होणार असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागसकर यांनी दिली.राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत मनसेने थेट विरोधीपक्ष नेतेपदाला गवसणी घातली.
मात्र, २०१७ च्या निवडणुकीत मनसे भाजपसोबत युतीमध्ये जाण्याच्या चर्चा असल्याचा फटका पक्षाला बसला तर पुण्यात मनसेचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले. त्यानंतर मनसेकडून पक्ष संघटना बळकट करण्याकडे लक्ष दिले असले, तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसेकडून काही ठराविक उमेदवारच देण्यात आले.
मात्र, मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना (ठाकरे) गट पुन्हा एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीकडून आंदोलनही करण्यात आले होते.
त्यामुळे आता पुण्यातही मनसे आणि शिवसेना एकत्र येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी पहिल्यांदाच संवाद साधणार असून मनसेची शिवसेनेसोबत असलेली युती, महापालिका निवडणुका, पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थातील भूमिका, राजकीय घडामोडी, पक्ष संघटना यावर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे.




