Pune News | चार दिवसांतच पुन्हा खड्डे ; निकृष्ट कामांवर कारवाई कुठे?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – यंदा पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे १०० टक्के पूर्ण केली असून, पुणेकरांना खड्डेमुक्त रस्त्यांचे स्वप्न दाखविणाऱ्या महापालिकेची झोप आता पुणेकरांची उडविली आहे. शहरातील खड्ड्यांची तक्रार पुणेकरांना थेट ठिकाणासह महापालिकेस करता यावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पीएमसी रोड मित्र’ ॲपवर आठ दिवसांतच तक्रारींचा पाऊस पडला असून, पुणेकरांनी फोटोसह तब्बल ५५४ तक्रारी नोंदविल्या आहेत.
तर त्यातील ३८९ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र, गणेशोत्सवापूर्वी शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने महापालिकेची चांगलीच तारांबळ उडाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, महापालिकेच्या पथ विभागाने पूर्वी दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा उघडे झाले आहेत.
रस्त्यावर खडी पसरल्याने वाहनचालकांची तारांबळ होत असून, खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे किरकोळ अपघातही घडत आहेत.सांडपाणी वाहिनी व ड्रेनेज लाईनची कामे केल्यानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती न झाल्याने पावसात रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
तक्रारी आल्यानंतर तातडीने खड्डे बुजविले जात असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. ५५४ तक्रारींपैकी ३८९ तक्रारींचे निवारण झाले असून, उर्वरित ६५ तक्रारींवर काम सुरू असल्याचे पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी यंत्रणा सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चारच दिवसांत पुन्हा खड्डे..
महापालिकेकडून गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील मध्यवर्ती भाग तसेच पेठांमधील मिरवणूक मार्गावरील खड्डे दुरुस्ती केली जाणार होती. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत पावसाने विश्रांती घेतलेली असतानाही हे काम करण्यात आले नाही. त्यानंतर १८ ऑगस्टपासून हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
मात्र, त्यानंतर शहरात तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काम केलेल्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालिकेस पुन्हा एकदा या रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. तर भर पावसातच ही कामे केल्याने ही कामे निकृष्टदर्जाची झाली आहेत. मात्र, त्यावर प्रशासनाकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.



