Pimpri : आवाजाने ओलांडली धोकादायक पातळी

पिंपरी : शहरातील ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होत असल्याची माहिती पर्यावरण अहवालाच्या निष्कर्षातून समोर आली आहे. गणेशोत्सव, दिवाळी या सणांच्या काळात औद्योगिक, निवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्राच्या ठिकाणी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळानुसार ५५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. मात्र, शहरातील शांतता क्षेत्रात देखील ही मर्यादा ६५ ते ८० डेसिबल पर्यंत पोहचल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि राज्य सरकारच्या नियमानुसार महापालिकेने २०२४-२५ चा पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार शहरातील ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्योगनगरीतील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे. शहरातील ध्वनी पातळीचा वार्षिक अहवाल पर्यावरण अहवालात दिला आहे.
शहरात क्षेत्रनिहाय विविध ठिकाणी दिवसा व रात्री ध्वनी पातळी तपासली गेली. त्यामध्ये शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या रुग्णालयांच्या परिसरामध्येच आवाज सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच गणेशोत्सव आणि दिवाळीच्या सणामध्ये आवाजाची मर्यादा वाढली आहे. चाफेकर चौक, चिंचवड, पिंपरी कॅम्प, शांतिनगर, भोसरी गावठाण या भागात ७० ते ८० डेसिबल आवाज जात आहे. मागील वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये ही आवाजाची पातळी मोजण्यात आली आहे.
तसेच रुग्णालयांच्या परिसरात देखील आवाजाची मर्यादा ५० पेक्षा जास्त आहे. शांतता क्षेत्रातच दणदणाट वाढला असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे निवासी क्षेत्र व शाळा परिसर असलेल्या भागात देखील मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण वाढले आहे. वाहनांचा वाढता वापर तसेच वाढलेली लोकसंख्या यामुळे दिवसेंदिवस ध्वनी प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. यामुळे शहरातील रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
डीजेच्या भिंती फोडताहेत कानाचे पडदे
गणेशोत्सव, दिवाळी यासारख्या सणांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते. गणेशोत्सव काळात चापेकर चौकात सरासरी ९५.०८, शांती नगर (पिंपरी) १०८.०९ व भोसरी गावठाणामध्ये ८६..३डेसिबलपर्यंत आवाज असल्याचे नोंदवले आहे. तसेच दिवाळीमध्ये दिवसा व रात्री टप्याटप्याने आवाजाची मर्यादा नोंदवली आहे. त्यामध्ये २४ ऑक्टोबर२०२४ ला दुपारी पिंपरी चौक ९४.५, चिंचवड चाफेकर चौक १०१.५ व थेरगाव डांगे चौक येथे ९४.२ डेसिबल आवाज नोंदवण्यात आला आहे.
क्षेत्रानुसार ध्वनी पातळी कशी असावी? (डेसिबलमध्ये)
क्षेत्र – दुपारी – रात्री
औद्योगिक क्षेत्र – ७५ – ७०
व्यावसायिक क्षेत्र – ६५-५५
रहिवाशी क्षेत्र -५५-४५
शांतता क्षेत्र – ५०-४०
शहरामध्ये सणांच्या काळामध्ये जास्त प्रदूषण वाढत आहे. रुग्णालयांच्या परिसरामध्ये मुख्य रस्ता, चौक असल्याने वाहनांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे या भागात ध्वनी प्रदूषण वाढत आहे.
– संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग.





