चिंबळी: गणेशोत्सवाला अवघे पंधरा दिवस शिल्लक असताना खेड तालुक्यातील मरकळ आणि कुरूळी परिसरातील कुंभार वाड्यात गणेश मूर्तींची नोंदणी आणि विक्री जोरात सुरू झाली आहे. गणेश मंडळे आणि भक्तांमध्ये मूर्ती बुकिंगसाठी उत्साहपूर्ण लगबग दिसून येत आहे. कुरूळी येथील माळशिकर आणि जगताप कुटुंबीयांनी १०,००० ते १५,००० आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या असून, त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरगुती स्थापनेसाठी १ ते २ फूट उंचीच्या मूर्तींची किंमत ५०० ते २,००० रुपये आहे, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ५,००० ते १०,००० रुपये किमतीच्या मूर्ती उपलब्ध आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे यंदा मूर्तींच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मूर्तीकार कारागीर सांगतात, “कच्च्या मालाच्या महागाईमुळे मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. कमीत कमी नफ्यावर विक्री करावी लागत आहे. गणेशोत्सव हा आमच्या संपूर्ण वर्षाच्या अर्थकारणाचा आधार आहे. व्यवसायापेक्षा परंपरा टिकवणे आणि सणाचा आनंद साजरा करणे महत्त्वाचे आहे.” गावोगावी मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लागले असून, तरुणांमध्ये मोठ्या मूर्तींच्या बुकिंगसाठी धावपळ सुरू आहे. या उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.