प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पुणे याठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तसेच देखावे पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील भाविकांनी मेट्रोला पसंती दाखवली. पिंपरी ते स्वारगेट मार्गावर मेट्रोतून प्रवास करीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तब्बल २ लाख ५५ हजार ५४९ जणांनी मेट्रोतून प्रवास केला. त्या दिवशी मेट्रो रात्रभर नागरिकांनी भरून वाहत होती. गणेशोत्सवातील आठ दिवसांत तब्बल १५ लाख २० हजार ४३१ जणांनी मेट्रोला पसंती दिली. त्यातून महामेट्रोला तब्बल २ कोटी ४३ लाख ६५ हजार १४ रूपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. गणेशोत्सव काळात पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पुण्यातील मानाचे गणपती दर्शनासाठी तसेच, आकर्षक देखावे पाहण्यासाठी आवर्जून जातात. त्या पार्श्वभूमीवर महामेट्रोने सकाळी सहा ते रात्री अकराची वेळ वाढवून रात्री दोनपर्यंत केली होती. ती वाढीव वेळ सात दिवस होती. तर, अखेरच्या दिवशी मेट्रो रात्रभर सुरू ठेवण्यात आली होती. पिंपरी ते स्वारगेट मार्गामुळे थेट पुण्यातील मध्यवस्तीतील मानाच्या गणपतीपर्यंत सहज पोहचता येत असल्याने नागरिकांची सोय झाली.गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी स्टेशनवर सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात आली होती. प्रवाशांना वारंवार सूचना देण्यात येत होत्या. तिकीट काढण्याबाबत मदत केली जात होती. तसेच, सफाईसाठी स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पिंपरीहून स्वारगेटकडे जाणारी तसेच, तिकडून येणारी मेट्रो भरून धावत होती. गणेशोत्सवामुळे मेट्रोच्या प्रवाशांत दुप्पटीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ३७ लाखांचे उत्पन्न.. गणेश विर्सजनाच्या दिवशी शनिवारी (दि.६) रात्रभर मेट्रो सुरू होती. नागरिकांनी मेट्रोतून प्रवास करीत पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला. त्यामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत मेट्रोत गर्दी होती. त्या दिवशी सर्वांधिक तब्बल २ लाख ५५ हजार ५४९ जणांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यातून महामेट्रोला ३७ लाख ३५ हजार ७२६ रूपयांचे उत्पन्न मिळाले. प्रवाशांकडून मेट्रोला प्रतिसाद… दिवस – प्रवासी संख्या- तिकीट विक्रीतील उत्पन्न -शनिवारी (दि.३०)-२ लाख १ हजार ३४३-२७ लाख ५७ हजार ८२८ -रविवार (दि.३१ )-१ लाख ७९ हजार ८५६- २५ लाख २५ हजार ७८७ -सोमवार (दि.१ )-१ लाख ६७ हजार ६५ -३० लाख ७७ हजार ८०४ -मंगळवार (दि.२)-१ लाख ४९ हजार १८८-२६ लाख ३४ हजार ८२० -बुधवार (दि.३)-१ लाख ८२ हजार ८३२ -३२ लाख ५० हजार ९८४ -गुरूवार (दि.४)-२ लाख ६ हजार ९६३ -३७ लाख ३५ हजार ७२६ -शुक्रवार (दि.५)- १ लाख ७७ हजार ६३५ -३१ लाख ७८ हजार ५९ -शनिवार (दि.६)-२ लाख ५५ हजार ५४९-३२ लाख ४ हजार ५ -एकूण-८ दिवस-१५ लाख २० हजार ४३१ -२ कोटी ४३ लाख ६५ हजार १४