Pune News | नऱ्हे परिसरात प्रवासी बसला आग ; सर्व प्रवासी सुरक्षित

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली. आगीत बस पूर्णपणे जळाली. बसमधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.बाह्यवळण मार्गावरून निघालेल्या प्रवासी बसमधून मध्यरात्री दोनच्या सुमारास नऱ्हे परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ धूर येण्यास सुुरुवात झाली.
बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. बसमधील वाहकाने त्वरित गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे केले. आग लागल्याची माहिती मिळताच घाबरलेले प्रवासी त्वरित बसमधून बाहेर पडले. बसमधील चालक आणि वाहकाने प्रवाशांनी उतरण्यासाठी मदत केली. बसमधून प्रवासी उतरल्यानंतर बसने पेट घेतला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत बस पूर्णपणे जळाली, तसेच घटनास्थळी मोठा धूर झाला होता.
बसमधून प्रवासी बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. बसमधील तांत्रिक बिघाड किंवा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
“बसमध्ये ४५ प्रवासी होते. बस विट्यावरून मुंबईकडे चालली होती. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची माहिती चालकाने दिली आहे.”
-दिलीप दाईंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड





