प्रभात वृत्तसेवा पुणे – मेट्रोसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली असली तरी प्रवाशांना पार्किंगसाठी स्वतंत्र सुविधा नसल्याने त्यांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी भर रस्त्यातच वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी होते आणि पोलिसांकडून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे प्रवाशांनाही दंडाचा भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र, या त्रासातून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. मेट्रो स्थानकांच्या परिसरात महापालिकेकडून महामेट्रोला २० जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून या जागांची अंतिम नोंदणी करण्यात आली असून, लवकरच त्या जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापन विभाग प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली.महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यातील काही स्थानकांवर थोड्याफार प्रमाणात पार्किंगसाठी जागा आहे. मात्र, प्रत्यक्षात मेट्रोचा वापर करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पीएमपीची फीडर सेवा केवळ काही ठराविक मार्गांवरच उपलब्ध असल्याने अनेक प्रवाशांना स्वतःची वाहने घेऊनच मेट्रोपर्यंत यावे लागते. त्यामुळे स्थानकांच्या आसपास मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. तसेच जागा नसल्याने प्रवासी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यामुळे महामेट्रोकडून महापालिकेकडे पार्किंगसाठी जागांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, काही जागा पार्किंग आरक्षणाखाली, तर काही ॲमेनिटी स्पेस म्हणून महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विस्तारित मार्गांचे काय? महामेट्रोकडून शहरातील दोन्ही मेट्रो मार्गांचा आराखडा तयार करताना पार्किंगच्या जागेसाठी कोणताही विचार करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता विस्तारित मार्गांचे काम करताना पार्किंग सुविधेचाही समावेश करावा, अशी मागणी होत आहे. सध्या महामेट्रोकडून स्वारगेट ते कात्रज, रामवाडी ते खराडी आणि वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मार्गांवर काम सुरू आहे. त्यामुळे हा आराखडा करतानाच पार्किंगबाबत विचार करावा, अशा सूचना महापालिकेकडून महामेट्रोलाही देण्यात आल्या आहेत.