Pune News | शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण अधांतरी! शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल रखडला

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शालेय शिक्षण विभागाने १ ते १५ जुलै दरम्यान ३ ते १८ वयोगटांतील शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोहीम राबविली. त्याला दोन महिने दोन महिने झाले तरी शिक्षणाधिकांऱ्यानी सर्वेक्षणाची अचूक माहितीच सादर केलेली नाही.शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपत आले तरी शाळाबाह्य मुले प्रवाहाबाहेरच आहेत.शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणणे, बालकांचे पालकांसोबतचे स्थलांतरण थांबविणे, त्याच परिसरात शिक्षण प्रवाहात ठेवणे, शिक्षण हमी कार्ड देणे ही सर्वेक्षणाची उद्दिष्टे होती.
राज्यात मोठ्या प्रमाणात कुटुंबे व्यवसायासाठी स्थलांतर करतात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यातही मुलींचे प्रमाण जास्त असते. खेडी, वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे, शेतमळे व जंगले, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिग्नल्स, हॉटेल्स – खानावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीट भट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, वंचित गटातील वस्त्या, स्थलांतरित कुटुंबे आदी सर्वेक्षणाची ठिकाणे ठरविली होती.
शिक्षण संचालनालयाने सर्वेक्षणाची माहिती सादर करण्यासाठी मुदत दिली होती. केवळ आठ जिल्ह्यांचीच माहिती सादर झालेली आहे. अन्य जिल्ह्यांची माहिती अर्धवट व चुकीची आहे. त्यामुळे संचालनालयाने अचूक माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहे.सर्वेक्षणाबाबतचा जाहीर होण्यासाठी आणखी महिना लागण्याची शक्यता आहे.




