Pune News : आता तंत्रज्ञानाने शिकवणार इतिहास ; शिवसृष्टीतील भव्य शिल्पाचे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते अनावरण

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे नव्या पिढीला इतिहास शिकवणे शक्य असल्याचे मत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. आंबेगाव बुद्रुक येथे निर्माणाधीन शिवसृष्टीमध्ये हा इतिहास पाहणे आता साध्य होईल असेही त्यांनी सांगितले.शिवसृष्टी प्रकल्पाअंतर्गत पुणे महापालिका आणि भारतीय राजमार्ग प्राधिकरणाच्या सहकार्यातून मुंबई- बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ उभारलेल्या शिवकालीन समूह शिल्पाचे लोकार्पण मिसाळ यांच्या हस्ते झाला.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, गारवे ग्रुपचे संचालक किशोर गारवे, शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम, विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अमृत पुरंदरे, सल्लागार मनोज पोचट, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते.हे प्रतिकात्मक शिवकालीन समूह शिल्प हे १५ फूट लांब, १५ फूट रुंद आणि तब्बल २५ फूट उंच आहे.
शिल्पकार दीपक थोपटे यांनी हे शिल्प साकारले आहे.युनेस्कोच्या मानांकनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक नकाशावरील स्थान ठळक होण्यास मदत होणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.कदम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन अजित आपटे यांनी केले. कुबेर यांनी आभार मानले.





