Pune News | रस्त्यांची अनावश्यक कामे होणार नाहीत ; पुणे ग्रँड सायकल टूरबाबत आयुक्तांचे स्पष्टीकरण

प्रभात वृत्तसेवा
पुणे : पुणे ग्रँड सायकल टूर या स्पर्धेसाठी शहरातील ६४.८० किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्ती व सौंदर्यकरणासाठी तब्बल १२२ कोटी ९७ लाख खर्च करण्यात येत आहेत. यासाठीच्या निविदांवरून प्रशासनाच्या भूमिकेवर आरोप होत आहेत. या निधीतून कोणत्याही चुकीच्या पद्धतीने अथवा दुबार कामे केली जाणार नाहीत, यासाठी काळजी घेतली जाईल. तसेच निविदांची फेरतपासणी करून प्रत्यक्ष कामे करताना संबंधित ठिकाणी केलेल्या कामांचा आढावा घेतला जाईल, असा खुलासा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे.
स्पर्धेसाठी कमी कालावधी असल्याने शासनाच्या सूचनेनुसारच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून आपल्या हद्दीतील कामांसाठी सात दिवसांच्या मुदतीच्या निविदा काढल्या असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सायकल स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. सायकल फेडरेशननेही आढावा बैठकीत ही मागणी केल्याने पालिकेने निविदा काढल्या आहेत.
निविदांनंतर या कामात कोणताही नवीन रस्ता अथवा डांबरीकरण न करता केवळ रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रति किलोमीटर १.८९ कोटींचा खर्च होणार आहे. त्यामुळे सुस्थितीतील रस्त्यांवरील फक्त दुभाजक रंगवणे, थर्मोप्लास्ट पट्टे, साइन बोर्ड, खड्डे दुरुस्ती किंवा अस्तरीकरणासाठी हा अव्वाच्या सव्वा खर्च केला होत असल्याचा आरोप केला जात आहेत.
“स्पर्धा शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्त्यांवरून जाणार आहे. त्यामुळे रस्ते सरसकट दुरुस्त केले जाणार नाहीत. केवळ गरज असेल तेथेच कामे होतील. कोणतीही अनावश्यक कामे होणार नाहीत. तसेच, करण्यात येणाऱ्या कामांवरही लक्ष ठेवले जाईल. रस्त्यांमध्ये काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग आहेत. शासनाने त्याची जबाबदारीही पालिकेवर दिली आहे.”
— नवल किशोर राम (महापालिका आयुक्त)




