Pune News : पालिकेत सामान्यांच्या वाहनांना नो एंट्री!
Pune News : नो पार्किंगमध्ये उभारावी लागणार वाहने, भरावा लागणार हजाराचा दंड

Pune News : आपले दैनंदिन प्रश्न तसेच महापालिकेशी संबधित कामांसाठी पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये येणाऱ्या पुणेकरांना आता हजाराचा भूर्दंड सोसावा लागू शकतो.
निवडणुका झाल्यानंतर महापालिकेत येणारे नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची विशेष काळजी घेतली आहे. त्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने पालिकेच्या आवारात येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनांना बंदी घातली आहे.
परिणामी, नागरिकांना पालिकेच्या आसपासच्या रस्त्यांवर नो पार्किंगमध्ये वाहने उभी करावी लागणार आहेत. येथे उभा केलेली वाहने पोलिसांनी उचल्यास ती सोडविण्यासाठीचा दंड तसेच जप्त वाहन जेथे नेले आहे तेथे जाण्यासाठी रिक्षाचा खर्च सोसावा लागणार आहे.
महापालिकेने मंगळवारपासूनच हे बदल केल्याने पालिकेत आलेल्यांनी पार्किंगसाठी शेवटी नो पार्किंगचा आधार घ्यावा लागला.
महापालिकेच्या जुन्या दगडी मुख्य इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालये आहेत. नवीन इमारतीत राजकीय पक्ष आणि नगरसचिव विभागाचे कार्यालय आहे. यातील जुन्या इमारतीच्या समोरील बाजूस तळमजल्यासह दोन मजल्याचे वाहन तळ आहे.
नवीन इमारतीत खालील बाजूस दोन मजल्यांचे भूमिगत वाहनतळ आहे. याशिवाय, नवीन आणि जुन्या इमारतीच्या मधल्या भागातही वाहने पार्किंग केली जातात.
आता निवडणूक झाल्याने महापालिकेत नवे १६५ नगरसेवक येणार असून त्यांची चारचाकी वाहने तसेच कार्यकर्त्यांची दुचाकी वाहने असणार आहेत. त्यामुळे पार्किंगचा गोंधळ लक्षात घेवून पालिकेने नवीन इमारतीत केवळ चारचाकी पार्किंगची सोय केली आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जुन्या इमारतीच्या पूर्व बाजूस असलेल्या पालिकेच्या राखीव पार्किंगमध्ये तसेच दोन मजली वाहनतळात सुविधा दिली आहे. मात्र, सामान्य नागरिकांना पार्किंगची सोयच दिलेली नाही.
परिणामी, सामान्य नागरिकांना पालिकेच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर वाहने पार्किंग करण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी आधीच हे रस्ते नो पार्किंग म्हणून घोषीत केले आहेत. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव नो पार्किंग मध्ये वाहने उभी करावी लागतील.
महापालिकेत शहरी गरीब योजना, वेगवेगळया प्रकारचे दाखले, पाणी पुरवठा, ड्रेनेज, मिळकतकर, समाज कल्याण, बांधकाम विभागांसह अन्य विभागांमध्ये नागरिकांची दररोज वर्दळ असते.
‘पालिकेच्या मुख्य इमारतीत प्रायोगिक तत्वावर हे बदल केले आहे. पालिकेची पहिली मुख्य सभा ६ फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर पार्किंगची काय स्थिती आहे हे लक्षात घेवून निर्णय होईल. सामान्य नागरिकांसाठी मुख्य इमारतीत जागा निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. तो पर्यंत आसपासच्या रस्त्यांवर असलेल्या नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई करू नये, अशी विनंती पोलिसांकडे पत्राद्वारे केली जाणार आहे.’ -राकेश विटकर ( मुख्य सुरक्षा अधिकारी, महापालिका)





