Pune News | नवीन मिळकतींमधून महापालिकेला १६८ कोटींचं उत्पन्न

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेच्या मिळकत कर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २७ हजार ३२९ नवीन मिळकतींची आकारणी केली आहे. यातून १६८ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. मागील वर्षी याच कालावधीत १६ हजार ५५८ मिळकतींची आकारणी झाली होती आणि त्यातून १०० कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते.
गेल्या काही वर्षांत नवीन मिळकतकर नोंदणीचे प्रमाण घटल्याने पालिकेच्या उत्पन्नातही घट झाली होती. त्यामुळे प्रशासनाकडून यावर्षी नव्याने एक लाख मिळकतींची नोंदणी करून कर आकारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात, पहिल्या चार महिन्यांतच मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.
या आर्थिक वर्षात ३ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. यासाठी नियोजन करण्यात आले असून, पहिल्या तीन ते चार महिन्यांत जवळपास ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. एक लाख नवीन मिळकतींची आकारणी आणि वर्षाअखेरीस तीन हजार कोटी रुपयांची वसुली, अशी दोन प्रमुख लक्ष्ये कर्मचाऱ्यांना दिलेली आहेत.
त्याअंतर्गत २८ पेठ निरीक्षकांना नवीन मिळकतींची नोंदणी करण्याचे, तसेच एक लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या २४ हजार मिळकतींची यादी देण्यात आली असून वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत या विभागास १५७१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
गावांचा निर्णय होईना..
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या मिळकतकराचा तिढा अजूनही कायम आहे. महापालिकेकडून ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पालिकेने या गावांना पालिकेच्या हद्दीलगतच्या भागानुसार कर आकारणी केली होती. मात्र, पालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांच्या तुलनेत हा कर अधिक असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि कर कमी करण्याची मागणी झाली होती.
त्यानंतर, शासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी या गावांच्या कर वसुलीला स्थगिती दिली होती. त्यानंतर महापालिकेने शहरात दोन वेगवेगळ्या कर आकारण्या करणे शक्य नसल्याचे कळविले, त्यानंतर अद्यापही याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे.




