Pune News : महापालिका आयुक्तांच्या आदेशाला हरताळ ; तीन आठवड्यानंतरही रस्त्यांकडेला राडारोडा, कचऱ्याचे ढीग

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरातील रस्त्यांवर, तसेच रस्त्यांकडेला मोठ्या प्रमाणात राडारोडा, कचऱ्याचे ढीग आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी महापालिकेच्या विकासकामांसाठी आणलेले पाण्याचे, ड्रेनेजचे पाइप, विद्युत विभागाचे पोल, झाडांच्या तोडलेल्या फांद्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात पडून आहे. याबाबत संबधित विभागांनी दहा दिवसांच्या आत स्वच्छता करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबधित विभागांना दिले होते. मात्र, या आदेशानंतर तीन आठवडे लोटले, तरी शहरातील चित्र कायम आहे.
विशेष म्हणजे या अस्वच्छतेबाबत आयुक्तांनी वारंवार वारंवार तोंडी सूचना दिल्या होत्या. सूचना दिल्यानंतरही स्थिती तशीच असून, आता आयुक्तांनी थेट विभागप्रमुखांच्या कामावरच नाराजी व्यक्त करत लेखी आदेश काढले आहेत, तसेच तातडीने स्वच्छता केली नाही, तर संबंधित विभागप्रमुखांची जबाबदारी निश्चित करून थेट कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका आयुक्तांकडून लेखी सूचना देऊनही काहीच फरक पडला नसल्याचे वास्तव आहे.
काय होते आयुक्तांचे आदेश..
आयुक्त कार्यालयाकडून ४ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आले, की शहर स्वच्छतेबाबत वेळोवेळी आयोजित बैठकीत दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही होणे अपेक्षित असताना पाडकाम कचऱ्याचे ढिगारे आणि झाडांच्या फांद्या अद्यापही पूर्णपणे उचलण्यात आलेल्या नाहीत. शहर स्वच्छतेबाबत ते स्वतः वेळोवेळी स्थळ पाहणी करीत असून, सातत्याने प्रयत्नशील आहेत.
तरीदेखील रस्त्यावर अस्ताव्यस्त पडून राहिलेला पाडकाम कचऱ्याचा ढिगारा पूर्णपणे उचलण्यात आलेला नाही. यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही पथ, भवन, पाणीपुरवठा, बांधकाम, मलनिःसारण, विद्युत, उद्यान, तसेच घनकचरा व्यवस्थापन या विभागांचे विभागप्रमुख आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडून ठोस कार्यवाही झालेली नाही.
आता दहा दिवसांत अल्टिमेटम..
पुढील १० दिवसांत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पाडकाम कचरा व झाडांच्या फांद्या पूर्णतः हटविण्यात याव्यात. प्रमुख रस्त्यांनंतर पुढील २० दिवसांत सर्व अंतर्गत रस्त्यांवरील पाडकामाचे ढिगारे हटवावेत. शहरात कुठेही कचऱ्याचे ढिगारे दिसल्यास संबंधित विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. त्यात पथ, भवन, पाणीपुरवठा, बांधकाम, मलनिःसारण, विद्युत, उद्यान, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागांचा समावेश होता.





